
पावसामुळे रस्त्याची दुरवस्था; दुचाकीस्वारांसह विद्यार्थ्यांची गैरसोय, तातडीने मुरूम टाकण्याची मागणी
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. १७ सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथून एकलव्य निवासी विद्यालय मार्गे लालडोंगरी, चामोर्शीकडे जाणारा बायपास रस्ता सध्या अक्षरशः चिखलाच्या विळख्यात सापडला आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून, त्यातून सुरू असलेल्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.

या मार्गावरून नागरिकांसह हरडे महाविद्यालयातील विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील चिखलामुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून, पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही चिखलातून मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याच्या अनेक ठिकाणी चिखलाचे थर साचल्याने वाहनांची ये-जा धोकादायक बनली आहे. पावसाळ्यात या मार्गाची अशीच अवस्था कायम राहिल्यास नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष किती दिवस?
नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या या बायपास रस्त्याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रस्त्यावर तातडीने मुरूम टाकणे, पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी उपाययोजना करणे तसेच रस्ता वाहतुकीस योग्य करणे आवश्यक आहे.
प्रशासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

