
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सावली येथील महिला कारपेट प्रशिक्षण केंद्राला भेट; प्रशिक्षणार्थींना केले मार्गदर्शन
न्युज जागर :योगेश रामटेके (विशेष प्रतिनिधी )
सावली:
स्थानिक महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या सावली येथील नवीन इमारतीमधील महिला ‘कारपेट’ प्रशिक्षण केंद्राला आज जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भेट दिली.
या वेळी त्यांनी प्रशिक्षण वर्गाची पाहणी करून उपस्थित महिलांशी संवाद साधला व त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
भेट दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रात सुरू असलेल्या विविध तांत्रिक व प्रात्यक्षिक कौशल्यांची सविस्तर पाहणी केली.

महिलांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या कारपेटचे (गालिचे) नमुने, त्यांची गुणवत्ता आणि या कामातील कौशल्य पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. हस्तकला आणि स्थानिक कौशल्याला योग्य बाजारपेठ मिळवून दिल्यास महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
केंद्राच्या प्रशासनाने नवीन इमारतीमधील उपलब्ध सुविधांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. या प्रसंगी प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, प्रशिक्षक आणि मोठ्या संख्येने महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे आणि मार्गदर्शनामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावली येथील कार्पेट युनिटमध्ये १ ऑक्टोबरपासून नवीन बॅचच्या प्रशिक्षणास सुरुवात होत आहे. तरी इच्छूक व गरजू महिलांनी अधिक माहिती व प्रवेशाकरिता तात्काळ कार्पेट युनिट, सावली येथे भेट देऊन संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.


