
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी : भाद्रपद शुक्ल पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या निमित्ताने मार्कंडादेव येथील प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिरात महिलांनी मोठी गर्दी केली. सप्तऋषींचे पूजन करून व्रताची सांगता करण्यासाठी दूरवरून महिला भाविक दाखल झाल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला. भाविकांच्या वाढलेल्या संख्येमुळे संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
ऋषिपंचमीचे व्रत महिलांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी सप्तऋषींची विधिवत पूजा-अर्चा करून सुख-शांती, आरोग्य, ऐश्वर्य आणि अखंड सौभाग्याची कामना केली जाते. यंदा हरितालिका गौरी व गणेश चतुर्थी आणि ऋषिपंचमीचे धार्मिक वातावरण एकाच कालावधीत असल्याने मार्कंडेश्वर मंदिरात भाविकांची विशेष वर्दळ पाहायला मिळाली.

मंदिर परिसरात पुरोहित व महाराज यांच्या हस्ते महिलांची पूजाअर्चा करून देण्यात आली. अनेक महिला भाविकांनी कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी तसेच सर्व दुःख दूर व्हावे, या श्रद्धेने ऋषिपंचमीचे व्रत केले.
पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
महिलांची मोठी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनानेही खबरदारी घेत चोख बंदोबस्त ठेवला. पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी, शासकीय बोट, स्विमर तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. मार्कंडादेव परिसरात दोन्ही बाजूंनी नाकाबंदी करून वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था गावाबाहेर करण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापन विभागही सतर्क
नदीपात्रात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने विशेष खबरदारी घेतली. भाविकांनी खोल पाण्यात जाऊ नये यासाठी नदीकाठावर लाल झेंडे लावण्यात आले. तसेच रबरी बोट, मदत केंद्र आदींची व्यवस्था करण्यात आली होती. तहसीलदार प्रशांत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सचिन मडावी, महसूल सहाय्यक गजभिये, माणिक कोडापे यांनी व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली.
दरम्यान, मंदिर परिसरात विविध महाराजांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे उद्यापन व पूजाअर्चा पार पडली. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध स्तरांतून करण्यात आलेल्या व्यवस्थेमुळे ऋषिपंचमीचा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. जगन्नाथ बाबा मठ देवस्थान येथे भाविकांसाठी उपवासाचे पदार्थही वितरित करण्यात आले.

