
कारमेल अकॅडमीचा १२ धावांनी पराभव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची दिमाखात निवड
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी : तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत चामोर्शी येथील निशिगंधा इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम सामन्यात कारमेल अकॅडमीच्या संघाचा तब्बल १२ धावांनी पराभव करत निशिगंधा स्कूलच्या खेळाडूंनी विजेतेपदावर आपले नाव कोरले. या दमदार कामगिरीच्या जोरावर संघाची जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १५ सप्टेंबर २०२६ रोजी हरडे कृषी महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. १४ वर्षे वयोगटातील सामन्यांमध्ये निशिगंधा स्कूलच्या संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामन्यात निशिगंधा स्कूलच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केली. अखेर कारमेल अकॅडमीवर १२ धावांनी मात करत विजेतेपद मिळविले. या विजयामुळे निशिगंधा स्कूलच्या संघाची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली असून, आता जिल्हास्तरावरही दमदार कामगिरी करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.
या विजयी संघात वंश वाढई, रणवीर पवार, स्वीकृत पोरेड्डीवार, सम्राट सहारे, शौर्य भुरसे, अरहान शेख, वोमीद बुरे, नक्ष पेंदाम, आदित्य हजारे, श्लोक करणे, सन्मय बोडूकवार, साहिल गाईन आणि प्रतीक पदा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव विवेकभाऊ सहारे यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन करून त्यांचे मनोबल वाढविले. तसेच शाळेच्या प्राचार्य संचालिका वालदे, शिक्षक हिराचंद उंदीरवाडे, मोरेश्वर कुनघाडकर, सिंधू रामटेके, मनीषा अवताडे, फिलिप लिंमा तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे कौतुक केले.
या यशाबद्दल राहुल लोक विकास मंडळाच्या अध्यक्षा कौशल्या सहारे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माणिक साखरे, मंडळाचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
निशिगंधा स्कूलच्या खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांच्या कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

