
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/घोट :
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथे नवीन कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीचे लोकार्पण आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यालय परिसरातील विविध सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती जाणून घेतली.
विद्यालयाच्या विकासकामांची पाहणी करताना आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळावे, तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यावर विशेष भर दिला. विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जुन्या निवासस्थानी भेट; आठवणींना उजाळा
या भेटीला भावनिक किनारही लाभली. आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यालयात असताना ज्या जुन्या निवासस्थानी वास्तव्य केले होते, त्या निवासस्थानाला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या विद्यालयाशी असलेले आपले जुने नाते आणि येथील आठवणी आजही मनात ताज्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“ज्या परिसराने घडण्याची आणि शिकण्याची संधी दिली, त्याच ठिकाणी आज वेगळ्या भूमिकेतून भेट देताना मनात एक वेगळाच आनंद आणि समाधानाची भावना निर्माण झाली,” अशी भावनिक प्रतिक्रिया आ. डॉ. नरोटे यांनी यावेळी व्यक्त केली.
विद्यालयातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांची गुणवत्ता, प्रगती आणि आवश्यक सुविधांबाबत त्यांनी संबंधितांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यालयातील पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी जि.प. सभापती नामदेव सोनटक्के, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेशजी वाढिकरे, उपपोलिस निरीक्षक कल्पेश खरवडे, भाजपा आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष विलास उईके, बूथ प्रमुख ऋषी कोडापे, विशाखाताई सिंह, प्राचार्या ममता लांजेवार, प्रा. इंदोरकर सर, प्रा. धनंजय चांदेकर, रिशिश्वर चौबे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

