
जिल्ह्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारींमध्ये आक्रमक पाठपुरावा.
अहेरीच्या विकासकामांपासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत प्रश्न लावून धरणाऱ्या संतोष मद्दीवारांची चर्चा.
अहेरी: अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामे, आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनातील कथित अनियमिततेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांच्यापासून ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यापर्यंत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी आणि पाठपुरावा केल्याने मद्दीवारांची जायंट किलर अशी राजकीय प्रतिमा समर्थकांकडून पुढे केली जात आहे.

जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत असताना श्रीराम पाचखेडे यांच्या कार्यपद्धतीविरोधात विविध तक्रारी समोर आल्या होत्या. विकासकामांच्या मंजुरीसंदर्भात कंत्राटदारांनी गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे कागदपत्रे सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पाचखेडे यांची बदली झाली आणि जानेवारी २०२६ मध्ये प्रसाद घाडगे यांनी जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
अहेरीतील महत्त्वाच्या विकासकामांबाबतही संतोष मद्दीवार यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष भेटी घेऊन विकासकामांची आवश्यकता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने त्यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याचे सांगितले जाते.
आरोग्य व्यवस्थेतील प्रश्नांवरही थेट मुंबई गाठली
यानंतर अहेरी येथील शासकीय महिला व बाल रुग्णालय तसेच जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवरून डॉ. वर्षा लहाडे यांच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रारींचा मुद्दा पुढे आला.
अहेरीतील आरोग्य व्यवस्थेतील अडचणी, डॉक्टरांच्या राजीनाम्यांचे प्रश्न आणि रिक्त पदांबाबत संतोष मद्दीवार यांच्यासह काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विधानभवनात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती.या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर चौकशी समिती नेमण्यात आल्याचेही वृत्त आले होते. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपद्धतीमुळे अहेरीतील काही डॉक्टरांनी राजीनामे दिल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला होता.
अखेर डॉ. लहाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई
या प्रकरणात १६ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. निलंबन आदेशात त्यांच्या कार्यकाळातील कर्तव्याबाबत गंभीर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.यामुळे अहेरी आणि गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेतील प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
प्रश्न मांडायचा आणि पाठपुरावा करायचा ही भूमिका
पाचखेडे प्रकरणात जिल्हा नियोजन विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आणि त्यानंतर त्यांची बदली झाली. आता डॉ. लहाडे प्रकरणात चौकशीच्या मागणीनंतर निलंबनाची कारवाई झाली आहे. या दोन्ही घटनांमध्ये संतोष मद्दीवार यांनी तक्रारी, भेटीगाठी आणि वरिष्ठ स्तरावरील पाठपुरावा केला असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे अहेरीच्या राजकीय वर्तुळात ‘अधिकाऱ्यांविरोधात केवळ आरोप न करता प्रश्न प्रशासनाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत नेऊन त्याचा पाठपुरावा करणारा पदाधिकारी’ अशी मद्दीवारांची प्रतिमा तयार होत असल्याची चर्चा आहे.
दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये सातत्याने पाठपुरावा केल्याने संतोष मद्दीवार यांची राजकीय सक्रियता सध्या चर्चेचा विषय ठरत असून, आगामी काळात अहेरीतील स्थानिक राजकारणात त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

