
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली:
पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा आणि दुर्दैवामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्यावर राज्य शासनाकडून निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १६ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचा कठोर आदेश जारी करण्यात आला असून, या कारवाईमुळे आरोग्य वर्तुळात आणि प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
नक्की काय आहे प्रकरण?

शासकीय आदेशानुसार, डॉ. वर्षा लहाडे यांनी आपल्या पदावरील पर्यवेक्षकीय जबाबदारी पार पाडताना गंभीर स्वरूपाचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष दाखवले, ज्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी देखील योजीली आहे.
निलंबन कालावधी आणि अटी:
निलंबना, आदेश: महाराष्ट्र नागरिक सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ च्या पोटनियम (१) (अ) मधील तरतुदींनुसार त्यांना आजच्या दिनांकापासून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यालय बदल:
निलंबन कालावधीत डॉ. वर्षा लहाडे यांचे मुख्यालय सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले असून, सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
खाजगी नोकरी किंवा व्यापारास मज्जाव:
निलंबन काळात त्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा (वर्तणूक) नियम, १९५९ च्या नियम १६ नुसार कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा स्वतःला व्यापार अथवा उद्योगधंद्यात गुंतवून घेता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास ते गैरवर्तणुकीचे ठरवून पुढील कारवाईस पात्र राहतील.
या कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता आणि इतर पूरक भत्ते देय राहतील.

