
पूरस्थितीत नदी-नाले व पाण्याच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
गडचिरोली, दि. १ ॶॉगस्ट: कुरखेडा तालुक्यातील मौजा खेडगाव येथे आज (दि. 1) दुपारी सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे, तलाव आणि इतर जलस्रोतांतील पाणीपातळी वाढली असून अशा ठिकाणी जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांची पाणीपातळी धोकादायकरीत्या वाढली असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्राथमिक माहितीनुसार, सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांपैकी लक्ष्मण सुन्हेर दुधकवर (वय 6 वर्षे), कुनाल नरेश दुधकवर (वय 5 वर्षे) आणि कोहित युवराज सराटे (वय 11 वर्षे) यांचा बुडून मृत्यू झाला. चौथ्या मुलाने प्रसंगावधान राखून स्थानिक नागरिक व मच्छीमार यांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य, पंचनामा व इतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली. प्राथमिक तपासानुसार तिघांचा मृत्यू बुडाल्यामुळे झाल्याचे तहसीलदार, कुरखेडा यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात नदी, नाले, तलाव, बंधारे, खाणीतील पाणीसाठे व इतर जलाशयांमध्ये पोहण्यासाठी किंवा आंघोळीसाठी जाऊ नये. पुलावरून किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत वाहन किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये.
पाण्याचा वेग आणि खोलीचा अचूक अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता वाढते. नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. विशेषतः पालकांनी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवून त्यांना जलस्रोतांपासून दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

