
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
अहेरी, दि. १ ऑगस्ट :अहेरी नगरपंचायतीचे कर निर्धारक अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजय कंकडलवार यांच्यासह अन्य तीन आरोपींना न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला आहे.
सुमारे दीड महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेने अहेरीसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. शासकीय अधिकारी असलेल्या वैभव पांढरे यांच्यावर कथित मारहाण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत डॉ. अजय कंकडलवार, अजय नेताम, श्रीनिवास लक्ष्मण आणि इम्रान पठाण या चौघांना अटक केली होती. या घटनेच्या निषेधार्थ विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या नियमित जामीन अर्जावर अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ रोहन रेहपाडे यांच्या न्यायालयात सविस्तर सुनावणी झाली. बचाव पक्षाकडून नागपूरचे वरिष्ठ अधिवक्ता तथा माजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध चांदेकर आणि अहेरीचे वरिष्ठ अधीवक्ता सतीश जैनवार यांनी न्यायालयासमोर कायदेशीर मुद्दे मांडले. सरकारी पक्षाचाही युक्तिवाद ऐकून न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे व परिस्थितीचा विचार करत चौघांनाही जामीन मंजूर केला.
न्यायालयाचा आदेश समोर येताच अहेरी शहरात डॉ. कंकडलवार यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. न्यायालय परिसरासह शहरातील विविध भागांत समर्थकांची गर्दी दिसून आली.

