
राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी; जड वाहनांवर बंदी आणि धानोरा मार्गाच्या डांबरीकरणाचीही मागणी
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
धानोरा : धानोरा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, महामार्गावरील जीवघेणे खड्डे आणि जड वाहनांच्या वाहतुकीच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका समिती, धानोरा यांच्या वतीने गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता शिवाजी महाराज चौक, धानोरा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाची दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, तसेच जड वाहने (ओव्हरलोड ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर) रस्त्यावरून बंद करावीत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय धानोरा ते पुढील मार्गाचा दर्जेदार डांबरी रस्ता करावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करण्याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका समिती धानोरा यांनी जाहीर केले आहे.

