
चामोर्शी, दि. ३० जुलै : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या-नाल्यांना पूर आला असून भोगणबोडी हेटी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावाकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे चामोर्शी–भोगणबोडी हेटी–जामगिरी हा मुख्य मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे गावांचा तालुक्याशी संपर्क तात्पुरता तुटला असून अत्यावश्यक सेवा, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
पूराचे पाणी वेगाने वाहत असल्याने रस्त्यावरून वाहने नेणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने नागरिकांना पूराच्या पाण्यातून वाहन किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. परिस्थितीवर महसूल व स्थानिक प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून पाणी ओसरल्यानंतरच मार्ग सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

