
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. ३० जुलै : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या व नाल्यांना पूर आला असून पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात ३,८३६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळे चिचडोह बॅरेजच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर ३० जुलै रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून चिचडोह बॅरेजमधून सुरू असलेला २,५७८ क्युमेक्सचा विसर्ग वाढवून ४,००० ते ५,००० क्युमेक्सपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पाण्याच्या आवकनुसार विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ किंवा घट करण्यात येणार आहे.

प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नदीपात्रात जाणे, पूरग्रस्त भागातून प्रवास करणे, गुरे चरायला नेणे तसेच कपडे किंवा भांडी धुण्यासाठी नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८.३० वाजेपर्यंत खालील मार्ग बंद होते:
• गडचिरोली–धानोरा राष्ट्रीय महामार्ग ९३० (रांगी नाला)
• कुरखेडा–वैरागड राज्य मार्ग ३७७ (सती नदी)
• कोरची–बोटेकसा राज्य मार्ग ३१४ (भिमपूर नाला)
• धानोरा–रांगी राज्य मार्ग ३६८
• बेटकाठी नाला (ता. कोरची)
• कुरखेडा–तळेगाव–चारभट्टी प्रमुख जिल्हा मार्ग ४६
• रोमपल्ली–झिंगानूर प्रमुख जिल्हा मार्ग २६ (ता. सिरोंचा)
• एटापल्ली–गट्टा राज्य मार्ग ३८१ (बांडिया नदी पूल)
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन केले आहे.

