
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार

गडचिरोली, दि. ३० जुलै : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान १२३.५ मिमी इतकी नोंदविण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तालुकानिहाय पर्जन्यमानात मुळचेरा (१६३.८ मिमी) अव्वल ठरला असून त्यापाठोपाठ गडचिरोली (१६३.७ मिमी), धानोरा (१६१.६ मिमी), अहेरी (१३६.३ मिमी), एटापल्ली (१२३.३ मिमी), आरमोरी (१२३.० मिमी), भामरागड (१२०.९ मिमी), सिरोंचा (११३.५ मिमी), कुरखेडा (११०.० मिमी), कोरची (१०१.७ मिमी), देसाईगंज (८६.० मिमी) आणि चामोर्शी (७८.८ मिमी) अशी नोंद झाली.

जिल्ह्यातील ४५ पैकी ४४ पर्जन्यमान केंद्रांची माहिती प्राप्त झाली असून भामरागड तालुक्यातील ताडगाव सर्कलची माहिती तांत्रिक अडचणीमुळे उपलब्ध होऊ शकली नाही.
यंदाच्या पावसात भामरागड सर्कलमध्ये सर्वाधिक २४१.७ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच मुळचेरा सर्कलमध्ये २१७.६ मिमी आणि पेंढरी (धानोरा) सर्कलमध्ये २१०.० मिमी पाऊस पडल्याने या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात २१ सर्कलमध्ये अतिमुसळधार (Very Heavy Rainfall) तर १८ सर्कलमध्ये मुसळधार (Heavy Rainfall) पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले ओसंडून वाहत असून सखल भागात पाणी साचले आहे. काही रस्त्यांवरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे, पूरग्रस्त किंवा नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे तसेच हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

