
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली

गडचिरोली: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर केला असला, तरी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे निकाल अद्यापही राखीव असल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांतील विद्यार्थी निकाल पाहत असताना गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना मात्र प्रतीक्षाच करावी लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पालकांकडून असा आरोप केला जात आहे की, जिल्हा परिषद गडचिरोलीकडून संबंधित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क वेळेत जमा न झाल्यामुळे निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी जर हे खरे असेल तर तो केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नसून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला गंभीर अन्याय असल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत.
निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता असून, पालक वारंवार शाळांमध्ये संपर्क साधत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणात शिक्षकांचा कोणताही संबंध नसतानाही त्यांनाच पालकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.
अलीकडेच राष्ट्रीय स्तरावर नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा पार्श्वभूमीवर गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती निकाल प्रशासकीय कारणांमुळे रखडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीशी निगडित असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, दोषी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सर्व विद्यार्थ्यांचे निकाल त्वरित जाहीर करावेत, अशी जोरदार मागणी पालक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून होत आहे.
“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणत्याही परिस्थितीत खेळ होऊ नये. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा,” अशी एकमुखी मागणी आता जिल्हाभरातून होत आहे.

