
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोटगुल पीएचसीकडून वेळेत योग्य उपचार न झाल्याचा आरोप; हिमोग्लोबिन फक्त 2 ग्रॅम – गडचिरोलीत उपचाराअभावी दुर्दैवी अंत
कोरची (प्रतिनिधी):
तालुक्यातील कोटगुल येथील शासकीय आश्रम शाळेत शिकणारी कु. संजना बिरसिंग जाळे (वय 15, इयत्ता 9 वी) हिचा गडचिरोली जिल्हा महिला रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजना ही गेल्या पाच दिवसांपासून तापाने आजारी होती. तिची प्राथमिक तपासणी कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली असता ती पीव्ही (Plasmodium Vivax) मलेरिया पॉझिटिव्ह आढळली. मात्र डॉक्टरांनी केवळ औषधे देऊन तिला पुन्हा शाळेत पाठवले. पुढील आवश्यक तपासण्या करण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे.
दरम्यान, तिचा ताप कमी न झाल्याने आश्रम शाळा प्रशासनाने पुन्हा तिला रुग्णालयात दाखल केले. यावेळी तपासणीत तिच्या शरीरातील हिमोग्लोबिन अत्यंत धोकादायक पातळीवर – फक्त 2 ते 3.5 ग्रॅम असल्याचे समोर आले. तसेच प्लेटलेट्सही केवळ 47 हजार इतके कमी असल्याचे निदर्शनास आले.
गंभीर स्थिती लक्षात घेता तिला तत्काळ गडचिरोली येथील जिल्हा महिला रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र तेथेही वेळेवर आणि प्रभावी उपचार न मिळाल्याने तिचा आज सकाळी मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निष्काळजीपणाचा आरोप:
स्थानिकांकडून असा आरोप करण्यात येत आहे की,
प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवातीपासूनच सखोल तपासणी झाली असती तर परिस्थिती टाळता आली असती.
एवढ्या कमी हिमोग्लोबिनच्या स्थितीत फक्त प्रायमाक्वीन (Primaquine) सारखी औषधे देऊन रुग्णाला पाठवणे गंभीर निष्काळजीपणा आहे.
असूनही बेफिकिरी?
कोटगुल परिसर हा आधीपासूनच मलेरिया डेंजर झोन म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी मलेरियामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. तरीही आरोग्य विभागाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच कोरची तालुक्यात एका गरोदर मातेचा हिमोग्लोबिन कमी असल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
मासिक पाळीमुळे हिमोग्लोबिन इतक्या मोठ्या प्रमाणात (2-3 ग्रॅमपर्यंत) कमी होणे शक्य नाही.
अशा परिस्थितीत तातडीने रक्त चढवणे (ब्लड ट्रान्सफ्युजन) आणि विशेष उपचार आवश्यक असतात.
प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत योग्य निदान आणि उपचार का झाले नाहीत?
रेफर केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दुर्लक्ष झाले का?
सलग मृत्यू घडत असतानाही आरोग्य विभाग झोपेत का?
एका निरागस विद्यार्थिनीचा मृत्यू केवळ आजारामुळे झाला की आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे, याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
—-
19 जुलै ला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेव्हा हिमोग्लोबिन तपासणी केली आणि ते व्यवस्थित होत त्या नंतर मुलीला मासिक पाळी आली आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे हिमोग्लोबिन खूप कमी झाले त्यामुळे तीला 23 जुलै रोजी गडचिरोली जिल्हा महिला रुग्णालयाला रेफर करण्यात आले– स्वप्नील चोरूडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल

