
भामरागड : सफाई कामगारांच्या EPFचा प्रश्न प्रलंबित ठेवणे आणि मासिक वेतन वेळेवर न देण्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) व सफाई कामगार युनियनच्या आदेशाने आज दिनांक 10 सप्टेंबर 2026 पासून भामरागड नगरपंचायतीचे सफाई काम बेमुदत बंद करण्यात आले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.
दिनांक 26 मे 2026 रोजी CPIच्या वतीने नगरपंचायतीला निवेदन देऊन सफाई कामगारांच्या EPFचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नाही. त्यातच मासिक वेतन वेळेवर मिळत नसल्याने कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शहराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या हक्कांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप CPIने केला आहे. कामगारांच्या श्रमाचा मोबदला आणि सामाजिक सुरक्षा हा त्यांचा हक्क असून, त्यासाठी त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणे ही प्रशासनाची गंभीर अपयशाची बाब असल्याचे CPIने म्हटले आहे.

# कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले
“सफाई कामगारांच्या श्रमावर शहराची स्वच्छता व्यवस्था उभी आहे. मात्र, त्यांनाच वेळेवर वेतन आणि EPF मिळत नसेल तर हा कामगारांवरील अन्याय आहे. 26 मे रोजी निवेदन देऊनही प्रशासनाने प्रश्न सोडवला नाही. त्यामुळे कामगारांना बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. कंत्राटदाराच्या प्रलंबित बिलातून कायदेशीर प्रक्रियेनुसार कामगारांचे थकीत वेतन आणि EPFची रक्कम सुरक्षित करून ती संबंधित कामगारांना देण्यात यावी. प्रत्येक कामगाराच्या EPF खात्याचा स्पष्ट हिशेब प्रशासनाने द्यावा. कामगारांच्या हक्काची रक्कम कोणत्याही परिस्थितीत दडपून ठेवू दिली जाणार नाही. कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील. प्रशासनाने तातडीने चर्चा करून प्रश्न निकाली काढावा; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असे CPI गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी स्पष्ट केले.
CPIने नगरपंचायतीकडे कामगारांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे, EPFची रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा करावी, EPF खात्यांची तपासणी करून संपूर्ण तपशील उपलब्ध करून द्यावा आणि यापुढे प्रत्येक महिन्याचे वेतन वेळेवर मिळेल याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.
आजच्या काम बंद आंदोलनावेळी कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव CPI गडचिरोली, कॉ. सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य, कॉ. दिनेश अरकी, कॉ. बाळू उईके, कॉ. समय येमुलवार तसेच सफाई कामगार युनियनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

