
एटापल्ली : गणेश स्थापना व पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एटापल्ली पोलिस स्टेशनच्या वतीने बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान रूट मार्च काढण्यात आला. आगामी सण-उत्सव काळात शहरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम राहावा, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलिसांनी शहरातील प्रमुख भागातून संचलन केले.
हा रूट मार्च राजीव गांधी चौक येथून सुरू होऊन बस स्टॉप, शिवाजी चौक, संस्कार पब्लिक स्कूल परिसर, इंदिरा वॉर्ड, बंगाली कॅम्प, एसडीपीओ कार्यालय परिसर, संविधान चौक तसेच मशीद रोड या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला. शहरातील संवेदनशील व गर्दीच्या भागातून पोलिसांचे संचलन झाल्याने नागरिकांचेही या रूट मार्चकडे लक्ष वेधले गेले.
रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. बर्गे साहेब, एटापल्ली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. बेले साहेब, पोलिस उपनिरीक्षक श्री. पायघन साहेब, पोलिस उपनिरीक्षक श्री. सुर्वेसे साहेब तसेच महिला पोलिस उपनिरीक्षक शिरशिकर मॅडम यांच्यासह पोलिस अधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय पोलिस स्टेशनचे २१ अंमलदार, क्यूआरटीचे ८ अंमलदार आणि एसआरपीएफचे ८ जवान अशा मोठ्या पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत हा रूट मार्च पार पडला.

रूट मार्चपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. बर्गे साहेब यांनी उपस्थित अधिकारी व अंमलदारांना सण-उत्सव काळात विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या. गणेश स्थापना, पोळा व आगामी धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणी लक्ष ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे तसेच शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक शांतता आणि संभाव्य अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एटापल्ली शहरात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांच्या या संचलनामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रशासन सज्ज असल्याचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचला. शांतता, सामाजिक सलोखा आणि नागरिकांची सुरक्षितता कायम ठेवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले असून रूट मार्च शांततेत पार पडला.

