
शिवाजी हायस्कूल, चामोर्शीच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा; इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत मिळणार दरवर्षी १२ हजारांची शिष्यवृत्ती
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (NMMS) घेण्यात आलेल्या सत्र २०२५-२६ परीक्षेत शिवाजी हायस्कूल, चामोर्शी येथील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी जानकीराम राऊत हिने गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत आपल्या विद्यालयासह चामोर्शीच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे.

वैष्णवीच्या या अभिमानास्पद आणि उल्लेखनीय यशाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते तिचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात अव्वल ठरण्याचा मान मिळविल्याने वैष्णवीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या परीक्षेतील यशामुळे वैष्णवीला शासनाच्या वतीने इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये, अशी शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुणवत्तेच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे विद्यार्थ्यांसमोर वैष्णवीने प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
वैष्णवीच्या या उज्ज्वल यशाबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, मंडळाचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य धनेंद्र चौधरी, उपप्राचार्य शाम भर्रे, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी वैष्णवीचे पालक जानकीराम राऊत उपस्थित होते. मुलीने मिळविलेल्या जिल्हास्तरीय यशामुळे पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
गुणवत्ता, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर वैष्णवीने मिळविलेला जिल्ह्यातील प्रथम क्रमांक हा केवळ तिच्या वैयक्तिक यशाचा गौरव नसून शिवाजी हायस्कूल, चामोर्शीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करणारा मानाचा अध्याय ठरला आहे.

