
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. १० सप्टेंबर : गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून, शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्री भुसे यांनी रामनगर, गोगाव, बोदलीसह विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळांमधील वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, ई-लॅब, संगणक लॅब, वाचनालय आदी सुविधांची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शाळांचा विकास लोकसहभाग, सीएसआर, जिल्हा नियोजन समिती व मानव विकास मिशनच्या माध्यमातून करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. जीर्ण व धोकादायक शालेय इमारतींचे तातडीने निर्लेखन करून नवीन इमारतींचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून रिक्त पदांवर लवकरच शिक्षक रुजू होतील, तसेच केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचेही भुसे यांनी सांगितले.
यावेळी विविध परीक्षा, विज्ञान, क्रीडा, स्काऊट-गाईड आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श व उपक्रमशील शिक्षकांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
“गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार आणि मूल्यांची रुजवणूक करणे ही काळाची गरज आहे,” असेही शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

