
प्रतिनिधी |भेंडाळा,दि.१० सप्टेंबर: प्रवासी घेऊन मुलकडे जात असलेल्या काळी-पिवळी वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याची घटना आज १० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास भेंडाळ्यापासून जवळच असलेल्या महावितरण कार्यालयाजवळ घडली. या अपघातात काळी-पिवळी चालकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून, वाहनातील एका प्रवाशालाही गंभीर मार लागल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काळी-पिवळी प्रवासी घेऊन मुलकडे जात होती. याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने काळी-पिवळीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, काळी-पिवळी चालकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, तर वाहनातील एका प्रवाशाला शरीरावर गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ घटनास्थळी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

या घटनेची माहिती पोलिसांना विचारणा केली असता संबंधित तक्रार आली नसल्याचे सांगितले.
महावितरण कार्यालयाजवळ झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास संबंधित यंत्रणेकडून करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

