
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
गडचिरोली, दि. २४ जुलै : अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार डॉ. विक्रांत भुरिया हे शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘शेतकरी संवाद दौऱ्या’ अंतर्गत विविध ठिकाणी बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या आणि मागण्या जाणून घेण्यात येणार आहेत.
दौऱ्याची सुरुवात दुपारी १२.३० वाजता चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील किसान भवनात शेतकरी बैठकीने होईल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता गुरवळा येथील किसान मंच सभागृहात शेतकरी बांधवांशी संवाद साधला जाईल.

यानंतर सायंकाळी ४.३० वाजता गडचिरोली शहरातील सुमानंद सभागृह, आरमोरी रोड येथे सुरजागड व झेंडेपार खाणग्रस्त गावांचे प्रतिनिधी, ग्रामसभा शिष्टमंडळ तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत खाणग्रस्त भागातील प्रश्न, स्थानिकांच्या समस्या आणि विकासासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
या शेतकरी संवाद कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

