
काटोल, प्रतिनिधी
काटोल विधानसभा क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोंढाळी–काटोल ते वडचिंचोली (राज्यसीमेपर्यंत) रामा-३२४ या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ३४० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे काटोल तालुक्यातील रस्ते विकासाला नवी दिशा मिळणार असून नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या मंजुरीबाबत काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी आनंद व्यक्त करत, राज्य शासनाचे तसेच केंद्र शासनाचे आभार मानले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा रस्ता प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात यश मिळाल्याने हे काटोल विधानसभा क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आमदार चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले की, काटोलच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा सक्षम करणे हेच आपले ध्येय असून, या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यसीमेपर्यंत दर्जेदार रस्ता निर्माण झाल्याने वाहतूक सुलभ होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल तसेच आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळेल.
आमदार म्हणाले, काटोल विधानसभा क्षेत्राचा तब्बल २५ वर्षांचा रस्ते विकासाचा बॅकलॉग आता भरून निघत आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांनी चांगल्या रस्त्यांची अपेक्षा ठेवली होती. आज त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने आपण मोठे पाऊल टाकले आहे. हा केवळ रस्त्याचा प्रकल्प नाही, तर काटोलच्या विकासाचा महामार्ग आहे. जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहणार असून, विकासाची ही गती कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आमदार ठाकूर यांनी यावेळी म्हटले.
या प्रकल्पासाठी सहकार्य आणि पाठबळ दिल्याबद्दल आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
काटोल विधानसभा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी आमदार चरणसिंग ठाकूर यांचे अभिनंदन करत, विकासकामांसाठी घेतलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक केले. अनेकांनी “गेल्या २५ वर्षांत जे शक्य झाले नाही, ते आमदार चरणसिंग ठाकूर यांनी करून दाखविले, अशा भावना व्यक्त केल्या.
या प्रकल्पामुळे काटोल विधानसभा क्षेत्राच्या विकासात नवे पर्व सुरू झाले असून, भविष्यातील वाहतूक, व्यापार आणि औद्योगिक वाढीसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


