
माजी आमदार डॉ. देवराव होळींच्या पुढाकाराचे स्वागत; आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वांगीण विकासावर होणार मंथन
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, १० ऑगस्ट : विकसित आणि समृद्ध गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीसाठी ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ हा विकासाचा सर्वसमावेशक आराखडा लोकसहभागातून तयार करण्यात यावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा SEARCH संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली. भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले.

दि. १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी गडचिरोली येथील आर. के. सेलिब्रेशन हॉलमध्ये ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच दैनिक, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांना सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे निमंत्रण डॉ. अभय बंग यांना देण्यात आले. यावेळी डॉ. बंग आणि डॉ. देवराव होळी यांच्यात गडचिरोली जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती व सिंचन, उद्योग, पर्यावरण, आदिवासी समाजाचे अधिकार, युवकांच्या अपेक्षा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर या विषयांवर व्यापक लोकचर्चा घडवून आणण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
‘गडचिरोलीचा विकास गडचिरोलीकरांच्या सहभागातूनच’
गडचिरोलीच्या विकासाचा आराखडा केवळ काही व्यक्ती किंवा एखाद्या राजकीय पक्षापुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या सहभागातून साकारला पाहिजे, असा महत्त्वपूर्ण मुद्दा डॉ. अभय बंग यांनी मांडला. नागरिक, युवक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या सूचनांचा समावेश करून २०४७ पर्यंतचा विकासाचा स्पष्ट रोडमॅप तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या चर्चेतून ‘गडचिरोलीचा विकास हा गडचिरोलीकरांच्या सहभागातूनच घडला पाहिजे’ हा विचार पुढे आला. जिल्ह्याच्या गरजा, उपलब्ध संसाधने आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून दीर्घकालीन विकासाचे नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात आला.
डॉ. अभय बंग यांच्या लोकसहभागाच्या सूचनेचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्वागत केले. ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ हा उपक्रम पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व गडचिरोलीकरांना सहभागी करून घेणारे व्यासपीठ ठरावे आणि विकसित गडचिरोलीची दिशा निश्चित करण्यासाठी व्यापक लोकचर्चा घडावी, यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गडचिरोलीच्या पुढील २० वर्षांच्या विकासाची दिशा ठरविणाऱ्या या कार्यशाळेकडे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांचे लक्ष लागले असून, यातून कोणते ठोस विकासविषयक प्रस्ताव पुढे येतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

