
प्रतिनिधी /रुपेश सलामे
गडचिरोली : विकसित गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीसाठी ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ चा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने दि. १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी गडचिरोली येथील आर. के. सेलिब्रेशन हॉल येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी तसेच दैनिक, टीव्ही आणि पोर्टल पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे निमंत्रण SEARCH संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग यांना देण्यात आले. यावेळी डॉ. अभय बंग यांनी ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ या उपक्रमाचे स्वागत करताना गडचिरोलीच्या विकासाचा आराखडा केवळ काही व्यक्ती किंवा राजकीय पक्षांपुरता मर्यादित न राहता तो लोकसहभागातून कसा साकारता येईल, याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना केली.

यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि डॉ. अभय बंग यांच्यात गडचिरोली जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती व सिंचन, उद्योग, पर्यावरण, आदिवासी समाजाचे अधिकार, युवकांच्या अपेक्षा तसेच जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत विकासासाठी वापर यांसह विविध विषयांवर व्यापक लोकचर्चा घडवून आणण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
‘गडचिरोलीचा विकास हा गडचिरोलीकरांच्या सहभागातूनच घडला पाहिजे’, हा विचार या चर्चेतून पुढे आला. जिल्ह्यातील नागरिक, युवक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या सहभागातून २०४७ पर्यंतचा विकासाचा स्पष्ट रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.
डॉ. अभय बंग यांनी दिलेल्या लोकसहभागाच्या सूचनेचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्वागत केले असून, ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ हा उपक्रम पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व गडचिरोलीकरांच्या सहभागातून विकसित गडचिरोलीची दिशा निश्चित करणारा व्यासपीठ ठरावा, यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

