
कान्होली व भेंडाळा येथे भेट देत शोकाकुल कुटुंबीयांचे केले सांत्वन

जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी,दि.८ नोव्हेंबर : राज्यावर दुष्काळाचे सावट असताना शेतकरी आत्महत्यांच्या दोन दुर्दैवी घटनांनी चामोर्शी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. कान्होली येथील दिवंगत शेतकरी अमोल दादाजी चौधरी आणि भेंडाळा येथील दिवंगत शेतकरी सचिन सातपुते यांच्या कुटुंबीयांची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमदार डॉ. मिलिंद सगुणाबाई रामजी नरोटे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाहनानुसार आमदार डॉ. नरोटे यांनी कान्होली येथे दिवंगत अमोल चौधरी यांचे वयोवृद्ध वडील दादाजी तुकाराम चौधरी व कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच भेंडाळा येथे दिवंगत सचिन सातपुते यांच्या पत्नी अश्विनाताई सातपुते व कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
एका कुटुंबाने कर्ता पुरुष गमावणे आणि एका वयोवृद्ध पित्याने आपल्या मुलाला गमावणे, ही वेदना शब्दांत व्यक्त करता येणारी नाही. विशेषतः वयोवृद्ध वडिलांवर मुलाच्या निधनाचे दुःख सहन करण्याची वेळ येणे मन हेलावून टाकणारे आहे. तसेच सचिन सातपुते यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांवर कोसळलेला दुःखाचा डोंगरही अत्यंत वेदनादायी आहे. या कठीण प्रसंगी दोन्ही कुटुंबांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना या संकटातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना आमदार डॉ. नरोटे यांनी व्यक्त केली.
शेतकरी कुटुंबांवर आलेल्या संकटाच्या काळात त्यांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा ज्येष्ठ नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर चुधरी, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, भाजपा तालुका महामंत्री शेषराव कोहळे, संजय खेडेकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष भुवनेश्वर चुधरी, नरेश अलसावार, लछमाजी क्षीरगावार, रुपेश चौधरी, संजय चलाख, किशोर डांगे, गुरुदेव सातपुते, सचिन सातपुते, तुळशीराम जुवारे, संतोष सातपुते, विठ्ठल सातपुते, अल्काताई सातपुते, किशोर बुरे, बोंडकुजी बुरे, मनोहर नंदगिरवार, एकनाथ सातपुते, सुनील सातपुते, शुभाष चुनारकर, प्रलय सहारे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

