
शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत आनंदोत्सव; नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांचा संवेदनशील उपक्रम!

नितेश गट्टीवार |जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. ८ नोव्हेंबर : शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अहोरात्र कष्ट करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याचा स्तुत्य उपक्रम गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी राबविला. नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सहकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या अमूल्य योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण! मात्र, संपूर्ण शहर दिवाळीच्या आनंदात रमलेले असताना शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सफाई कर्मचारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि शहराचे सौंदर्य कायम टिकून राहावे, यासाठी हे कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या मेहनतीची जाणीव ठेवत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्यात आला.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर म्हणाल्या की, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते केवळ कर्मचारी नसून शहराच्या स्वच्छतेचे खरे शिलेदार आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच आपले शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहते. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद आणि समाधान हीच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमातून सफाई कर्मचाऱ्यांप्रती आदर, सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. केवळ सण साजरे करणे नव्हे, तर समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या हातांचा सन्मान करणे, हाच या उपक्रमाचा खरा उद्देश ठरला.
यावेळी नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर, नगरसेवक सागर अरुण निंबोरकर, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, नगरसेविका अवंती धंदरे, शिल्पा गव्हारे आदी उपस्थित होते.

