
तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; उपचाराधीन तिघींसाठी प्रशासनाची धावपळ – दोषींवर कारवाईचे संकेत
गडचिरोली, दि. १० ऑगस्ट : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या हृदयद्रावक घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, घटनेमागील निष्काळजीपणा आणि सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक आणि नागपूर येथील विशेष पथके आज जपतलई येथे दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या निवासाची परिस्थिती, सुरक्षेच्या उपाययोजना, व्यवस्थापनाने केलेली खबरदारी आणि नियमांचे पालन याची सखोल तपासणी केली जाणार आहे.

‘दोषी आढळल्यास कारवाई’
या दुर्घटनेत कोणाची निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा समोर येतो का, याची चौकशी केली जाणार आहे. चौकशीत सुरक्षाविषयक त्रुटी किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उपचाराधीन तिन्ही विद्यार्थिनींवर विशेष लक्ष
घटनेतील अन्य तीन विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना तातडीने सर्पदंश प्रतिबंधक औषध (अँटी-व्हेनम) देण्यात आले असून, रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
अँटी-व्हेनमचा पुरेसा साठा उपलब्ध असून, उपचारात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना विशेष सूचना दिल्या आहेत.
आश्रमशाळांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह!
जपतलई येथील आश्रमशाळा अनुदानित असल्याने निवासी विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांची जबाबदारी संबंधित संस्था व व्यवस्थापनाची आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या राहण्याच्या ठिकाणी सर्पप्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना होत्या का? परिसराची नियमित तपासणी केली जात होती का? विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शासनाच्या नियमांचे पालन झाले का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतून शोधली जाणार आहेत.
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला शोक
जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. उपचाराधीन विद्यार्थिनींना सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार आणि सहकार्य तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
चौकशीच्या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष
तीन निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही दुर्घटना केवळ सर्पदंशाची घटना म्हणून न पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतील संभाव्य त्रुटींची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे, अशी भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.
आदिवासी विकास विभागाच्या पथकाच्या चौकशीनंतर नेमकी चूक कुठे झाली आणि त्याला जबाबदार कोण? याचा उलगडा होणार असून, अहवालाच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

