
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी एटापल्ली तालुक्यात विविध कार्यक्रम, रॅली आणि घोषणांनी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, याच दिवशी मर्पल्ली गावाकडे जाणाऱ्या नाल्यावरील पुलाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
मर्पल्लीकडे जाणाऱ्या नाल्याची आणि पुलाची अत्यंत खराब अवस्था असून, नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी तालुका काँग्रेस प्रमुख नेते तथा अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती श्री. प्रज्वल नागूलवार यांच्या नेतृत्वाखाली भूमिया फकरी रापंजी, बम्मा रापंजी, किशोर मझझी, शिवाजी लेकामी, मधुकर रापंजी, सत्तू पुंगाटी, मनीष हेडो, करण हेडो, करण हलामी, मोतीराम गावडे, मधुकर मितलामी, निलेश लेकामी, रमेश बावणे, सुधाकर रापंजी, लालूजी लेकामी, गणेश कुळयेटी, अभिजित सिडाम, वाडुजी लेकामी, नरेश लेकामी, विलास हिचामी आदींनी नाल्यावरच सरकारविरोधात तीव्र निषेध नोंदवत प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला.
“१० दिवसांत लेखी आश्वासन द्या; अन्यथा याच नाल्यावर आमरण उपोषण!”
“शासनाने १० दिवसांच्या आत पुलाच्या दुरुस्तीबाबत लेखी स्वरूपात ठोस आश्वासन दिले नाही, तर याच नाल्यावर आमरण उपोषण करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी “भाजपा सरकारचं करायचं काय?”, “नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो” अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
आदिवासी दिनाच्या उत्सवाच्या दिवशीच मर्पल्लीच्या नाल्यावरून सरकारला दिलेला हा अल्टिमेटम आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

