
न्यूज जागर|प्रतिनिधी
चामोर्शी: चामोर्शी तालुक्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडी, वाढते अपघात आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांवर चामोर्शी पत्रकार संघाने गडचिरोली येथे पोलीस अधीक्षकांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी चामोर्शी शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी निदर्शनास आणून तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी चामोर्शी पत्रकार संघटनेचे सचिव सोनू वाळके, कार्याध्यक्ष नितेश गट्टीवार, उपाध्यक्ष श्रावण वाकोडे व धनराज वासेकर, सहसचिव मारोती बारसागडे, सल्लागार हस्ते भगत, संघटक सुखसागर झाडे, आदि उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की, चामोर्शी तालुक्यातील कोनसरी लॉयड मेटल कंपनी तसेच सुरजागड-हेडरी परिसरातील औद्योगिक प्रकल्पांमुळे जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व वाहनांचा भार राष्ट्रीय महामार्ग NH-353C वर येत असून, चामोर्शी शहरातील मुख्य रस्ता अरुंद आहे. रस्त्यालगत व्यापारी आस्थापने असून स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेक वाहने मुख्य रस्त्यावरच उभी राहतात. परिणामी नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अपघातांची शक्यता वाढत असल्याचे पत्रकार संघाने अधोरेखित केले.
यावेळी शहरातील अपघातप्रवण चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल व अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली. यामुळे वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करता येईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अल्पवयीन व विनापरवाना वाहन चालविणाऱ्या युवकांचे समुपदेशन करून त्यांना कायद्याची जाणीव करून द्यावी, जेणेकरून त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नाही, अशी सूचनाही करण्यात आली.
चामोर्शीतील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यास लॉयड मेटल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) माध्यमातून कंत्राटी वाहतूक सहाय्यक नियुक्त करण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशीही सूचना पत्रकार संघाने केली. यामुळे वाहतूक नियंत्रणास मदत होण्याबरोबरच स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते, असे मत यावेळी मांडण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असली तरी प्रत्येक नागरिकानेही वाहतूक नियमांचे पालन करणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून सहकार्य करणे आवश्यक असल्याचे पत्रकार संघाने स्पष्ट केले.
चामोर्शीतील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून आता पोलीस प्रशासन या मागण्यांवर कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण चामोर्शीकरांचे लक्ष लागले आहे.

