
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी,दि.२० जुन: काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सातत्याने कार्य करणारे तालुका काँग्रेस मीडिया अध्यक्ष विजय लाड तसेच आदिवासी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावणारे पिपलदास सोयाम यांची पक्षातील महत्त्वाच्या पदांवर निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, सर्वसामान्यांच्या समस्या शासनापर्यंत मांडणे आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विजय लाड व पिपलदास सोयाम यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

सत्कार समारंभात शहर काँग्रेस अध्यक्ष विलास चिचघरे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष हेमंत कोवासे, संजय बुरांडे, आशिष घेर संदीप सोयाम,यांच्यासह एनएसयुआय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी विजय लाड व पिपलदास सोयाम यांना पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. तसेच त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाला तालुक्यात नवी ऊर्जा मिळेल, संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल आणि पक्षाचे जनाधार वाढविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना विजय लाड यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. पक्षाच्या धोरणांचा प्रचार-प्रसार करून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी सांगितले. तर पिपलदास सोयाम यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि विकासाच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनात्मक बांधणीस अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

