
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली
भामरागड,दि.१५ जून :
नारगुंडा गावातील एका आदिवासी तरुणाने रचला इतिहास. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी संपादन करत, सूरज पुंगाटी ठरला गावाचा पहिला डॉक्टर. गरिबी आणि दुर्गमतेच्या अंधारातून जिद्दीच्या प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास प्रेरणादायी आहे.

“जिद्द असली की दिशा आपोआप मिळते,” हे सूरजने सिद्ध केले आहे .
दुर्गम भागातील तरुणांनी ध्येय गाठल्यास काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सूरज विष्णू पुंगाटी. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत, सूरजने एमबीबीएस पदवी मिळवून आपल्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेला सूरज आपल्या गावातील पहिला एमबीबीएस डॉक्टर ठरला आहे. पुण्यातील ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ (LFU) संस्थेचा मोफत शिक्षणाचा आधार आणि स्वतःची जिद्द यामुळे हा खडतर प्रवास यशस्वी झाला. सूरजची ही यशोगाथा आज गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरली आहे.

