
उपविभागीय अधिकारी यांनी एका हप्त्यात तोडगा न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे चर्चा करू-पत्रकार संघाचा इशारा
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
चामोर्शी, दि.१६ जून : चामोर्शी शहरासह ,मार्कंडा देव परिसरात वाढत्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत चामोर्शी पत्रकार संघाने उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेदरम्यान संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून लवकरात लवकर प्रभावी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले.
अवजड वाहनांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली
कोनसरी येथील लॉयड मेटल कंपनी तसेच सुरजागड प्रकल्पामुळे चामोर्शी शहरातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली असून, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचा मुद्दा पत्रकार संघाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.
पहाटेच्या ट्रक वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त
घोट रोड-कृष्णनगर-भोगनबोडी मार्गावर मुरूम वाहतुकीसाठी पहाटे ४.३० ते ५.३० वाजेदरम्यानही ट्रकची वाहतूक सुरू राहत असल्याने सकाळी फिरायला जाणारे नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच कृष्णनगर परिसरातील रहिवाशांना धुळीचा त्रास आणि अपघाताचा धोका सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
शहरातील अनेक ठिकाणे अपघातप्रवण
आष्टी टी-पॉइंट, हत्ती गेट परिसर, जिल्हा परिषद कार्यालयाजवळील मार्ग, शिवाजी हायस्कूल परिसर तसेच महाविद्यालय परिसर हे गंभीर अपघातप्रवण क्षेत्र बनले असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची गंभीर बाब पत्रकार संघाने मांडली.
सिग्नल व सीसीटीव्हीची मागणी प्रलंबित
वाहतूक नियंत्रणासाठी शहरात सिग्नल यंत्रणा व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सातत्याने मागणी होत असतानाही ती अद्याप प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचेही पत्रकार संघाने निदर्शनास आणून दिले.
मार्कंडा देव परिसरात नियोजनाचा अभाव
अधिक मासानिमित्त मार्कंडा देव येथे भाविकांची संख्या वाढली असून वाहनांची वर्दळही वाढली आहे. त्यातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) सुमारे १०० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. मात्र, ग्रामपंचायत, मंदिर ट्रस्ट आणि संबंधित कंत्राटदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे भाविक व स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली.
पत्रकार संघाच्या प्रमुख मागण्या चामोर्शी शहरात कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण व्यवस्था उभारण्यात यावी, आष्टी टी-पॉइंट, हत्ती गेट, जिल्हा परिषद कार्यालय परिसर व महाविद्यालय परिसरात विशेष वाहतूक नियोजन करण्यात यावे,
अपघात स्थळ येथे ट्राफिक सिग्नल व CCTV लावण्यात यावे ,लॉयड मेटल कंपनी च्या CSR फंडातून उभारणी करावी, अतिरिक्त पोलीस कर्मचारी व स्वतंत्र वाहतूक नियंत्रण पथकाची नियुक्ती करण्यात यावी,मार्कंडा देव परिसरात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक व सुरक्षित पादचारी मार्ग निर्माण करण्यात यावेत, एमएसआरडीसी, मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायत व संबंधित विभागांच्या समन्वयातून सुरक्षा उपाययोजना व पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात यावी.मंदिर ट्रस्ट च्या आवारात धड महिलांसाठी बाथरूम नाही ते अगोदर करावं,
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन प्रभावी कृती आराखडा तयार करण्यात यावा.पत्रकार संघाची ठाम भूमिका
अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य संकट टाळण्यासाठी प्रशासनाने आताच ठोस पावले उचलावीत अशी ठाम भूमिका पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी यावेळी मांडली.
शि्टमंडळात यावेळी पत्रकार संघाच्या वतीने विनोद खोबे, सोनू वाळके, अरुण गव्हारे, धनराज वासेकर , मारोती बरसागडे, आणि सुखसागर झाडे उपस्थित होते.
सदर निवेदनाच्या प्रती तहसीलदार, चामोर्शी पोलीस स्टेशन, नगरपंचायत चामोर्शी, ग्रामपंचायत मार्कंडा देव तसेच मार्कंडा देव मंदिर ट्रस्ट यांनाही देण्यात आल्या आहेत.

