
{नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली}
गडचिरोली,दि.१५ जून:
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ व नियम २०१७ ची प्रभावी अंमलबजावणी करावी, दिनांक २७ मार्च २०२६ च्या शासन निर्णयातील दिव्यांगविरोधी तरतुदी रद्द कराव्यात, सर्व पात्र दिव्यांगांना मानधन सुरू करावे तसेच शासकीय योजना, सवलती व हक्कांचा लाभ तात्काळ उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली समोर सुरू असलेल्या शांततापूर्ण साखळी उपोषणाला महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला.

विदर्भ दिव्यांग व्यक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी होत त्यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला व त्यांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. दिव्यांग बांधवांच्या मागण्या या केवळ मागण्या नसून संविधानाने आणि कायद्याने प्रदान केलेले त्यांचे मूलभूत हक्क असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे म्हणाले की, “दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देणे ही शासनाची नैतिक तसेच कायदेशीर जबाबदारी आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतानाही अनेक दिव्यांग व्यक्ती आज त्यापासून वंचित आहेत. शासनाने त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा आणि प्रलंबित मागण्यांची त्वरित पूर्तता करावी.”
तसेच, “दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घ्यावी. त्यांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक न झाल्यास हे आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूप धारण करेल,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी शासनाला दिला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कोवासे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, दिवाकर निसार,ढिवरू मेश्राम,सुधीर बांबोळे, विपुल येलटीवार, गौरव येनप्रेड्डीवार व जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

