
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
गडचिरोली,दि.१५ जून : देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळात विकास, विश्वास, सुशासन, जनकल्याणकारी योजना तसेच भारताच्या सक्षम परराष्ट्र धोरणामुळे जगात निर्माण झालेल्या नव्या भारताची ओळख जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, गडचिरोलीच्या वतीने सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी राज्यसभा खासदार मायाताई इवनाते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मोदी सरकारने गेल्या बारा वर्षांत समाजातील सर्व घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले असून महिलांचे सक्षमीकरण, गरीब कल्याण आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला गती दिली आहे. तसेच भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांमुळे विकासाची नवी दारे खुली झाली असल्याचे सांगितले. शासनाच्या योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंपर्क अभियान अधिक प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, रेल्वे आणि डिजिटल क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून आल्याचे सांगितले. देशाच्या सुरक्षेसोबतच परराष्ट्र धोरणात भारताने मजबूत आणि स्वाभिमानी भूमिका घेत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी पक्षाच्या वतीने जिल्हाभर विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून मोदी सरकारच्या विकासकामांची आणि जनकल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक गाव आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
या पत्रकार परिषदेला राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोळकर, माजी खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, माजी सभापती प्रमोद पिपरे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामे, जनकल्याणकारी योजना, देशाची मजबूत सुरक्षा व्यवस्था आणि प्रभावी परराष्ट्र धोरणाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून “विकसित भारत” या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

