
अमित कत्तीवार, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी : अहेरी तालुक्यातील दुर्गम भागातील एका तरुणाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनीने उपचारासाठी तातडीने २ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याने संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी तालुक्यातील वाटरा येथील २८ वर्षीय सागर शंकर मेडपल्ली याच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या दुखापतीनंतर त्याला धनुर्वात (टिटनेस) या गंभीर आजाराची लागण झाली. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने उच्चस्तरीय वैद्यकीय उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सागरला १४ विशेष इंजेक्शन्स देणे आवश्यक असून, एका इंजेक्शनची किंमत सुमारे २० हजार रुपये आहे. त्यामुळे उपचाराचा एकूण खर्च लाखोंच्या घरात जाणार असल्याने त्याच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. दुर्गम भागातील सर्वसामान्य कुटुंबासाठी एवढा खर्च करणे शक्य नसल्याने मदतीची गरज निर्माण झाली होती.
ही बाब लक्षात घेत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून पुढाकार घेत तातडीने २.८० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या मदतीमुळे सागरच्या उपचारासाठी आवश्यक असलेली महागडी इंजेक्शन्स उपलब्ध करून देणे शक्य झाले असून, कुटुंबावरील आर्थिक ताणही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत करण्यात आल्याची माहिती मिळाली. लॉयड्सकडून वेळेवर मिळालेल्या सहकार्याबद्दल सागरच्या कुटुंबीयांनी कंपनीचे आभार व्यक्त केले आहेत.
ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांना वेळेवर आर्थिक मदत मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात, याचे हे एक महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून उद्योगसमूहांनी अशा प्रकारे गरजू नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. सागरच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

