
चामोर्शी | प्रतिनिधी
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील क. क. जलाशय (दिना) प्रकल्प १०० टक्के भरल्याने शुक्रवारी (दि. ३१ जुलै) सकाळी ६ वाजल्यापासून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या परिसरातील तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी दिला आहे.
उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग चामोर्शी यांनी तहसीलदार, चामोर्शी यांना पाठविलेल्या पत्रानुसार, जलाशयाची सध्याची पाणीपातळी २३२.२५ मीटर असून जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. सध्या सांडव्यावरून ६८ सेंटीमीटर उंचीने (सुमारे १२५.६६ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने पुढील काही तासांत विसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या खालील भागातील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व शेतीची साधने सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत, पोलीस व संबंधित यंत्रणांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

