
प्रलय सहारे
भेंडाळा (प्रतिनिधी): भेंडाळा गावातील विविध ठिकाणांवरील पोलवरील स्ट्रीट लाईट गेल्या तीन दिवसांपासून भरदिवसा सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे.
दिवसा स्ट्रीट लाईट सुरू राहिल्यामुळे वीजेची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून, त्याचा आर्थिक बोजा अखेर सर्वसामान्य नागरिकांवरच पडत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. ऊर्जा बचतीचे आवाहन करणाऱ्या प्रशासनानेच अशा प्रकारच्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करणे ही चिंतेची बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गावातील नागरिकांनी संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन स्ट्रीट लाईट व्यवस्था सुरळीत करावी, दोषी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा प्रकारची वीजेची उधळपट्टी होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
“वीज वाचवा”चा संदेश देणाऱ्या यंत्रणेकडूनच भरदिवसा स्ट्रीट लाईट सुरू राहणे म्हणजे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याची चर्चा भेंडाळा परिसरात रंगली आहे.

