
गहूबोडी-जामगिरी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांचा कथित जमीन अधिग्रहणाविरोधात संताप; करारनामे रद्द करण्याची मागणी
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
गडचिरोली,दि.१५ जून:

चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी-जामगिरी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी कथित जमीन अधिग्रहण आणि खासगी कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आदिवासींच्या अशिक्षितपणाचा व माहितीअभावी गैरफायदा घेत काही दलालांकडून जमिनी हडपण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाचा कोणताही अधिकृत आदेश किंवा अधिसूचना नसताना जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून ॲडव्हान्स देऊन करारनामे करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे १०० एकरांहून अधिक जमीन करारबद्ध करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे सर्व व्यवहार तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मारोडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गहूबोडी गावाच्या सरपंचांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता जमीन अधिग्रहणासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मंजूर केल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला. या पार्श्वभूमीवर गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली असून, गावातील कोणत्याही जमिनीच्या अधिग्रहणास मंजुरी देऊ नये, असा ठराव ग्रामसभेत एकमुखाने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय शासनाची परवानगी मिळाल्याचे खोटे सांगून वारसदार व नातेवाईकांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही दलालांकडून होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. आदिवासींच्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, संबंधित करारनामे रद्द करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना जिल्हा कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष विश्वजीत कोवासे, निकेश गद्देवार परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सुधीर बांबोडे, राकेश तोरे, सूर्यकांत शेडमाके, देवाजी कुळमेथे, विशाल सोयाम, भगवान कुळमेथे, यशवंत कुडमथे रत्नदीप कुळमेथे, शुभम मडावी, भास्कर कुळमेथे, यमाजी कोडाप, नरेश कुळमेथे, नागराज कुळमेथे आदि उपस्थित होते.

