
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी SP एम. रमेश यांच्या संकल्पनेतून उपक्रम; शालिनी ताई मेघे हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजन
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत दुर्गम व अतीदुर्गम भागातील आदिवासी व गोरगरीब नागरिकांच्या आरोग्यासाठी आज कोरची पोलीस स्टेशन येथे भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

हा उपक्रम पोलीस अधीक्षक मा. श्री. एम. रमेश सा., अप्पर पोलीस अधीक्षक अभियान मा. श्री. कार्तिक सा., अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन मा. श्री. गोकुळ सा. यांच्या संकल्पनेतून आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा मा. श्री. रविंद्र भोसले सा. यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. शालिनी ताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी मा. श्री. शैलेंद्र एल. ठाकरे सा. होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रदीप जोशी – जनरल फिजिशियन नागपूर, डॉ. अद्विवीत निचट – कम्युनिटी मेडिसिन नागपूर, डॉ. आरती सातपुते – नेत्ररोग तज्ञ नागपूर, डॉ. प्रांजल नागोसे – ऑर्थोपेडिक सर्जन नागपूर उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. पोस्टे कोरचीचे सपोनि मा. देशमुख सा., पोउपनि मा. नागेश टेकाम सा., पोउपनि मा. योगेश पवार सा. तसेच पोस्टे हद्दीतील पोलीस पाटील व 140 ते 150 नागरिक उपस्थित होते.
सपोनि देशमुख सा. यांनी आहारातील बदल, हवामानातील बदल व त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम याबत मार्गदर्शन केले. नियमित तपासणी व व्यायामाचे महत्त्व पटवून देत पोलीस दादालोरा खिडकी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना व प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. प्रदीप जोशी यांनीही आरोग्यविषयक सविस्तर माहिती दिली.
मेळाव्यात एकूण 115 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व औषधोपचार करण्यात आला. यापैकी 39 रुग्णांना पुढील उपचारासाठी शालिनी ताई मेघे हॉस्पिटल नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. त्यात 19 मोतीबिंदू ऑपरेशन, 5 कर्णबधीर, 5 ऑर्थो, 3 सर्जरी, 6 मेडिसिन व 1 डर्मेटो चे रुग्ण समाविष्ट आहेत. या सर्वांवर मोफत उपचार होणार आहेत.
दुपारी 3:00 वाजता शांततेत मेळावा संपन्न झाला. यशस्वी आयोजनासाठी जिल्हा पोलीस अधिकारी-अंमलदार व SRPF चे जवान यांनी सहकार्य केले. उपस्थित सर्व नागरिकांसाठी पोलीस स्टेशन कोरचीच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

