
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
मोर्चानंतरही प्रशासन निष्क्रिय; दिलेल्या आश्वासनाला ८ महिने उलटूनही कार्यवाही शून्य
कोरची नगरपंचायत हद्दीत करण्यात आलेल्या सिटी सर्वे कामात गंभीर त्रुटी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रभारी जिल्हा भूमी अधीक्षकांनी या कामातील चुका अधोरेखित करत अहवाल सादर केला असतानाही स्थानिक भूमी अभिलेख कार्यालयाकडून अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

माहितीनुसार, सिटी सर्वे करताना संबंधित विभागाने प्रत्यक्ष स्थळी जाऊन मोजमाप न करता कागदोपत्री काम पूर्ण केले. परिणामी सनद व आखीव पत्रिकांमध्ये नमूद करण्यात आलेले सर्वे क्रमांक चुकीचे असून अनेक घरांचे क्षेत्रफळही चुकीच्या पद्धतीने नोंदवले गेले आहे.
या त्रुटींमुळे नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना गेल्या आठ वर्षांपासून सनद व आखीव पत्रिका मिळालेल्या नाहीत. प्रभारी भूमी अधीक्षक बोरसे व आंबेकर यांनी वेळोवेळी कोरची येथे भेट देऊन दुरुस्तीचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही.
दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी कोरची येथील नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सनद व आखीव पत्रिका दुरुस्त करून देण्याची जोरदार मागणी केली होती. त्या वेळी नव्याने प्रभार स्वीकारलेले जिल्हा भूमी अधीक्षक विजय भालेराव यांनी “मी नुकताच प्रभार घेतला असून एका महिन्याच्या आत सर्व चुका दुरुस्त करून सनद व आखीव पत्रिका वितरित करण्यात येतील,” अशी ग्वाही दिली होती.
मात्र, या आश्वासनाला तब्बल आठ महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी कोरची येथील भूमी अभिलेख कार्यालयात दुरुस्तीबाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
या परिस्थितीचा थेट परिणाम नागरिकांच्या शासकीय योजनांवरील हक्कांवर होत असून अनेक पात्र नागरिक प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित राहिले आहेत.
दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोली दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील सिटी सर्वे काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, कोरचीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुक्यात अद्यापही काम अपूर्ण असून प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सदर प्रकरणात कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सनद व आखीव पत्रिका दुरुस्त करून मिळणार की पुन्हा सिटी सर्वे करण्यासाठी नागरिकांना आणखी एक मोर्चा काढावा लागणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सिटी सर्वेतील सर्व त्रुटी तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना सनद व आखीव पत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

