
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
निवडणूक रद्द करण्याची मागणी; नायब तहसीलदार गणेश सोनवणे यांना निवेदन सादर
कोटगुल येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत कथित गैरप्रकार झाल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकरी व वनपट्टेधारकांनी आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामुळे काही काळ तहसील परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मोर्चादरम्यान शेतकरी प्रतिनिधींनी नायब तहसीलदार गणेश सोनवणे यांना निवेदन सादर केले. यावेळी सोनवणे यांनी निवेदन स्वीकारून प्रकरण वरिष्ठ पातळीवर पाठवून आवश्यक त्या स्तरावर पत्रव्यवहार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शेतकऱ्यांनी संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत ही संपूर्ण प्रक्रिया अपारदर्शक व नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात आल्याचे सांगितले. २८ गावांचा समावेश असलेल्या संस्थेत केवळ एका ग्रामपंचायतीचे वर्चस्व निर्माण करून लोकशाही प्रक्रियेला हरताळ फासण्यात आल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
निवडणुकीबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, मतदार यादी व जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला नाही, गुप्त पद्धतीने बिनविरोध निवडणूक पूर्ण करण्यात आली, संस्थेतील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना शासनाच्या बोनस व प्रोत्साहनपर रकमेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर मुद्दा देखील मोर्चात उपस्थित करण्यात आला. व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक निवडणूक घ्यावी
वनपट्टेधारकांना प्रलंबित बोनस व प्रोत्साहनपर रक्कम तात्काळ द्यावी
दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी
२०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीतील धान खरेदीची चौकशी करावी
या मोर्चात नारद फुलारे, प्रेमलाल उसेंडी, विनोद कोरेटी, गिरजा कोटी, अनिल केरामी, मानू कुमरे, शीला सोनकोतरी गजेंद्र मडावी, चिंताराम सोनफुल, अर्जुन मुलेटी, प्रेमलाल कुमरे, अवधराम कार्यपाल, पुरुषोत्तम कोल्हे, निकेश आचला, रामलाल मुलेटी, अविनाश हारामी, पवन मडावी, कमल नैताम, उशेन्द्र बिच्छी,सोनसाय गावडे, जयलाल रामटेके, देवीदास सोरी,मुकेश गंगासागर,गणेश्वरी बागडेहारिया, अनिता पुळो, कलाबाई सोनकुकरा यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी सहभाग घेतला. महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला दिला आहे.

