
अमित कत्तीवार विशेष जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. २८ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. फुलणगार पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामुळे नक्षलवादाच्या नावाखाली दहशत पसरविण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे
मिळालेल्या माहितीनुसार , २५ जुलै २०२६ रोजी फुलणगार पोलीस मदत केंद्रापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर हिदूर–देवेर मार्गावरील दोन झाडांमध्ये लाल रंगाचे कापडी बॅनर तसेच पांढऱ्या रंगाची पत्रके लावण्यात आली होती. या बॅनर व पत्रकांवर नक्षलवादी मजकूर लिहून परिसरात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती तसेच स्थानिक बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. या तपासात सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
जोगा रैनु धुर्वा (वय ४०)
मालू कोंडे धुर्वा (वय ४२)
दलसू मुरा तेलामी (वय ५०)
चैतु डुंगा धुर्वा (वय ५३)
गणेश देबू आलामी (वय ४०)
राजेश दल्लू वड्डे (वय ३२)
हे सर्व आरोपी भामरागड तालुक्यातील विविध गावांतील रहिवासी असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी नक्षलवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यात नक्षलवादविरोधी “ऑपरेशन अंतिम प्रहार” ही विशेष मोहीम सुरू ठेवली असून, अशा अफवा, बनावट प्रचार आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जात आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “नक्षल सप्ताह अथवा नक्षलवादाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही भुलथापांना नागरिकांनी बळी पडू नये. कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होऊ नये. समाजात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
या कारवाईमुळे नक्षलवादाच्या नावाखाली खोटा प्रचार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

