
कार्मेल अकादमीच्या रुदया जुवारेची उल्लेखनीय कामगिरी; पुढील स्पर्धांसाठी मानाचा मार्ग मोकळा
प्रतिनिधी|भेंडाळा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित चेस (बुद्धिबळ) स्पर्धेत कार्मेल अकादमी, चामोर्शी येथील विद्यार्थिनी रुदया नोमेश्वर जुवारे हिची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बुद्धिमत्तेची, एकाग्रतेची आणि रणनीतीची प्रभावी छाप उमटवत रुदयाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
लहान वयातच बुद्धिबळासारख्या कौशल्य, संयम आणि तल्लख विचारशक्तीची कसोटी पाहणाऱ्या खेळात रुदयाने मिळविलेले यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. तिच्या या कामगिरीमुळे कार्मेल अकादमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेचे नाव क्रीडा क्षेत्रातही उज्ज्वल झाले आहे.

रुदयाच्या जिल्हास्तरीय निवडीबद्दल शाळेतील शिक्षकवृंद, पालक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आगामी स्पर्धांमध्येही रुदया आपल्या बुद्धिमत्तेची आणि जिद्दीची चमक दाखवत आणखी मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आपल्या यशाचे श्रेय रुदयाने आई-वडील तसेच शिक्षकवृंदांना दिले आहे. तिच्या या यशामुळे चामोर्शी परिसरातूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

