
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
गडचिरोली, दि. २८ जूलै : भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी २९ जुलै रोजी रेड अलर्ट आणि ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, बांडिया आदी नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची तसेच अनेक नाले-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) तसेच इतर व्यावसायिक प्रशिक्षण संस्था २९ जुलै रोजी बंद राहतील.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे, पूरग्रस्त नदी-नाले, ओढे व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

