
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
चामोर्शी : शेतकऱ्यांच्या हक्काचा घास हिरावून घेणाऱ्या अन्यायकारक जमीन अधिग्रहणाविरोधात आता चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील १४ गावे पेटून उठली आहेत. आपल्या शेतजमिनी वाचवण्यासाठी आणि शासनाच्या धोरणाविरोधात एल्गार पुकारत, या चौदाही गावांतील हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत आज दि.२८ जुलै रोजी दणदणीत जनजागृती मोर्चा काढला. या मोर्चानंतर संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमका लढा? जयरामपूर परिसरामध्ये एमआयडीसी प्रकल्पांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहण केली जात आहे.

मात्र, या अधिग्रहणाचा स्थानिकांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. पिढ्यानपिढ्या कसलेली शेती, बागायती जमिनी आणि उपजीविकेची एकमेव साधने वाचवण्यासाठी या भागातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या पावित्र्यात होते. अखेर, आज १४ गावांतील शेतकरी रस्त्यावर उतरले.

‘जनजागृती रॅली ने वेधले लक्ष ‘हातात निषेधाचे फलक, आणि तोंडावर शासनाविरोधी घोषणा, अशा जोशपूर्ण वातावरणात शेतकऱ्यांनी काढलेली पायी जनजागृती रॅली अत्यंत शिस्तबद्ध मात्र आक्रमक स्वरूपाची होती. महिला, तरुण, वृद्ध आणि बालगोपाळांनीही मोठ्या संख्येने या रॅलीत सहभाग घेतला. “आमची जमीन आमचा श्वास, तो हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही,” ”जमिन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची”अशा तडाखेबंद घोषणा देत शेतकऱ्यांनी परिसर दुमदुमून सोडला.
प्रशासनाला सज्जड इशारा या पायी जनजागृती रॅली च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रशासनाला आणि शासनाला थेट इशारा दिला आहे. जोपर्यंत जमीन अधिग्रहणाचा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच तीव्र ठेवला जाईल, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला असून, या जनजागृती रॅली ची दखल घेत शासन काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

