
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/मुंबई,दि.१३ जून:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट 2026 पासून महिला जेष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC( National common mobility card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत.

उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांचेही कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्यभरात चार हजाराहून अधिक एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सक्रियपणे सेवा देत आहेत.
दरम्यान एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्ड ची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रावर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्राचा वितरण परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल ,असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे, या उद्देशाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी एक ऑगस्ट पूर्वी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

