
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली,दि.१२ जून :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पवन गेडाम यांची गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी, दिलीप सुरपाम यांची अहेरी जिल्हाप्रमुखपदी तर डॉ. श्रीकांत बनसोड यांची गडचिरोली जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार विनायक राऊत तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासह सह संपर्क प्रमुख महेश केदारी आणि इतर पदाधिकाऱ्यांना दिले आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या नियुक्त्यांमुळे गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढेल आणि गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास शिवसैनिक आणि पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात पक्ष विस्ताराला गती मिळणार असून आगामी काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अधिक प्रभावीपणे जनतेसमोर काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

