
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/चामोर्शी,दि.१२ जून:
गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाची आणि सर्वात मोठी तहसील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तहसीलमध्ये अद्याप स्थायी तलाठीची नियुक्ती नसल्याने महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम होत असून सातबारा, फेरफार, वारस नोंदी, जमीन मोजणी आणि विविध दाखल्यांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.तसेच अनेक कामे प्रलंबित राहत असल्याने येथे त्वरित स्थायी तलाठीची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना युवा कार्यकर्ते स्वप्निल चिंतलवार यांनी केली आहे.
चामोर्शी येथे स्थायी तलाठीचे पद नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तहसीलमध्ये महसूल यंत्रणेचा एक महत्त्वाचा दुवा असलेले पद रिक्त राहणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि जमीनधारकांना बसत आहे.

महसूल विभागातील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक प्रकरणे रखडलेली आहेत. शेतकऱ्यांना पीककर्ज, अनुदान आणि विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
चामोर्शी तहसीलमध्ये वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र आणि वाढते प्रशासकीय कामकाज लक्षात घेता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून त्वरित स्थायी तलाठीची नियुक्ती करण्यात यावी, अशीही मागणी शिवसेना युवा कार्यकर्ते स्वप्निल चिंतलवार यांनी केली आहे.

