
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
राजाराम (गडचिरोली) दि. २७ जुलै: विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, मतदानाचे महत्त्व समजावे आणि नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, राजाराम येथे शैक्षणिक सत्र २०२६–२७ अंतर्गत शालेय विद्यार्थी प्रतिनिधी (बालसंसद) निवडणूक उत्साहपूर्ण आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष लोकशाहीचा अनुभव देणारी ठरली.
निवडणुकीसाठी शाळेत स्वतंत्र मतदान कक्षाची उभारणी करण्यात आली होती. मतदानासाठी मतपत्रिका, मतपेटी तसेच मतमोजणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान करून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत दिले. मतदानाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी शिस्त, जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांचे उत्तम दर्शन घडवले.

या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पार पाडली. पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार इयत्ता सातवीचा ऋषिकेश गड्डमवार याची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. नक्ष सिडाम याने उपमुख्यमंत्रीपद पटकावले. रोनक आलाम याची क्रीडामंत्री, सिद्धार्थ बामनकर याची शिक्षणमंत्री, हिमांशी सडमेक हिची आरोग्यमंत्री, सोनाक्षी आत्राम हिची कला व सांस्कृतिक मंत्री, वरद मडावी याची भोजन व्यवस्था व पाणीपुरवठा मंत्री तसेच संस्कृत सिडाम याची पर्यावरण मंत्री म्हणून बहुमताने निवड करण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंतराव सडमेक, उपाध्यक्ष जितेंद्र गड्डमवार तसेच केंद्रप्रमुख पुलुरवार सर यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व, मतदानाचा अधिकार, जबाबदार नागरिकत्व आणि प्रभावी नेतृत्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ मतदान न करता लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने भविष्यात जबाबदार नागरिक घडण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालसंसद निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, सहकार्याची भावना आणि लोकशाहीविषयक जागरूकता वाढीस लागल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

