
“दरार तान्हापोळा उत्सवात बालगोपालांचा राहणार जल्लोष”
उत्कृष्ट नंदी, सजावट व वेशभूषेला आकर्षक बक्षिसे; रीलस्टार साहिल कडक व अँकर रजनी पॉल यांची विशेष उपस्थिती
मूल : प्रतिनिधी

दरार दुर्गा मंडळ, मूल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालगोपालांसाठी दरार तान्हापोळा उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता महात्मा ज्योतिबा फुले चौक, पोस्ट ऑफिसजवळ, मूल येथे उत्साहात पार पडणार आहे.
तान्हापोळ्याच्या निमित्ताने बालगोपालांमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि पारंपरिक संस्कृतीची जपणूक व्हावी, या उद्देशाने दरार दुर्गा मंडळाकडून विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उत्कृष्ट नंदी, उत्कृष्ट सजावट तसेच उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या बालगोपालांना विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे उत्सवासाठी येणाऱ्या सर्व नंदी बालगोपालांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याने बालगोपालांचा उत्साह आणखी द्विगुणित होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉमेडियन व रीलस्टार साहिल कडक यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच आपल्या दमदार अँकरिंगच्या माध्यमातून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अँकर रजनी पॉल यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे.
दरार तान्हापोळा उत्सवात मूल शहरातील तसेच परिसरातील बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले नंदी, आकर्षक सजावट व पारंपरिक वेशभूषा सादर करावी, असे आवाहन दरार दुर्गा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी News Jagar…

